• Sun. Jul 26th, 2026

इंदिरानगर-रूपादेवी पाडा जलयोजनेचे लोकार्पण; ५२ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे हजारो नागरिकांना दिलासा



इंदिरानगर-रूपादेवी पाडा जलयोजनेचे लोकार्पण; ५२ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे हजारो नागरिकांना दिलासा

ठाणे / प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील इंदिरानगर आणि परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर दिलासा देणाऱ्या नव्या जलसुविधेचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नव्या संप (संपवेल) आणि पंप हाऊसच्या माध्यमातून एकूण ५२ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, त्यामुळे हजारो नागरिकांना नियमित व मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकार्पण कार्यक्रमास विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका यज्ञा भोईर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, इंदिरानगर येथील संपमधून ३१ एमएलडी आणि रूपादेवी पाडा येथील संपमधून २१ एमएलडी, असा एकूण ५२ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा या योजनेद्वारे होणार आहे. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होईल.

या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या योजनेमुळे विशेषतः महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पासाठी आवश्यक जागा मिळविण्यासाठी २०१८ मध्ये एमआयडीसीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य झाली.

या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतिनगर, वारली पाडा, रामनगर, किटी तलाव, जुना गाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे.

नागरिकांना नियमित, सुरक्षित आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन आणि ठाणे महापालिका पुढेही कटिबद्ध राहतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें