मराठीचे ज्ञान नसलेल्या १,२६८ रिक्षाचालकांना नोटीस
परिवहन विभागाची राज्यभर विशेष तपासणी मोहीम; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या १,२६८ चालकांना नोटीस बजावण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३,९९५ चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना मराठीचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान नसल्याचे आढळले. तर मुंबई आणि उपनगर वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, ६६४ चालकांना नोटीस देण्यात आली.
चालक आणि प्रवाशांमध्ये दैनंदिन व्यवहारातील संवाद सुलभ व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी यापूर्वीही संधी आणि वेळ देण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालकांबाबत प्रशासनाची भूमिका सहानुभूतीची असल्याचे सांगितले. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

