खारघरच्या झेरॉक्स दुकानात एसआयआर अर्ज सापडले; पाच बीएलओ निलंबित
अर्ज अनधिकृतपणे बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा; जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : खारघर सेक्टर १९ मधील झेरॉक्स दुकानात पनवेल विधानसभा मतदारसंघातील एसआयआर प्रक्रियेतील सुमारे ३,४०० प्रगणक पत्रे आढळल्याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. संबंधित अर्ज अनधिकृतपणे बाळगल्याप्रकरणी सूरज पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वाधिक अर्ज आढळलेल्या पाच मतदान केंद्रांशी संबंधित बीएलओंना निलंबित करण्यात आले आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीदरम्यान गुरुवारी खारघरमधील एका झेरॉक्स सेंटरमध्ये अन्य भागांतील एसआयआर अर्ज आढळल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या अर्जांची माहिती खासगी व्यक्तींकडे कशी पोहोचली, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता.
तक्रारीनंतर प्रशासनाने झेरॉक्स सेंटरची पाहणी केली. तेथे ११ मतदान केंद्रांशी संबंधित सुमारे ३,४०० अर्ज आढळले. यातील सर्वाधिक अर्ज पाच मतदान केंद्रांचे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या प्रकरणी सूरज पाटील याच्याविरोधात भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
दरम्यान, अर्ज अनधिकृतपणे झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर गेल्याच्या प्रकरणात संबंधित पाच बीएलओंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसआयआर अर्ज प्रकरणाला आता प्रशासकीय कारवाईचे वळण मिळाले आहे.

