मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर आजपासून कारवाई; वायूवेग पथकाकडून परवाना तपासणी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक असल्याच्या नियमाची अंमलबजावणी आजपासून कठोरपणे करण्यात येणार आहे. मराठी येत नसलेल्या चालकांना सुरुवातीला एक महिन्याची मुदत देऊन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित, तर पुढे कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
मराठीचे व्यावहारिक ज्ञान आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार असून, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नसलेल्या चालकांचीही तपासणी केली जाणार आहे. आरटीओच्या वायूवेग पथकांकडून रस्त्यावरच तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी मराठी प्रशिक्षण घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, काही चालकांनी सोशल मीडियावर मराठी न शिकण्याची भूमिका मांडली आहे. अशा मुजोरीला आपण घाबरत नसून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ‘रोजगार बुडवणे हा उद्देश नसला तरी मराठी अस्मिता आणि नियमांचे पालन आवश्यक आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

