महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे हृदय शस्त्रक्रिया
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत होते. यानंतर त्यांच्यावर आता हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. तसेच मंत्रालयात पार पडलेल्या सर्व बैठकांमध्ये छगन भुजबळ उपस्थित होते.
छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील बैठकांमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या होत्या. पण मंत्रालयाचं कामकाज आटोपल्यानंतर छगन भुजबळ यांना थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यानंतर सोमवारी भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोमवारी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रिये नंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

