महाराष्ट्राच्या खेळाडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गौरव; प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा सत्कार केला. यावेळेस स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिग्स आणि राधा यादव यांचा सन्मान करत प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे रोख बक्षीसही देण्यात आले. महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना २२.५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पार पडलेल्या फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी दणदणीत पराभव करुन इतिहास रचला. या पार्श्वभूमीवर राज्यातील या तीन खेळाडूंचा शुक्रवारी गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राचा अभिमान’ अशा शब्दांत या तीनही खेळाडूंचे वर्णन असे केले. टीम इंडियाचा हा विजय तरुण मुलींना खेळांमध्ये सहभागी होण्यासह जागतिक स्तरावर चमकण्यासाठीही प्रोत्साहन देईल.
पुढे मुख्यमंत्री फडणवीस असेही म्हणाले की, “तुम्ही महाराष्ट्राचा गौरव केलाय. तुमच्या विजयामुळे राज्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सेमिफायनलमध्ये जेमिमाने झळकावलेली सेंच्युरी टर्निंग पॉइंट ठरली, या विजयामुळे आपण फायनलमध्ये धडक मारली. कमबॅक करुन या टीमने एखाद्या कुटुंबाप्रमाणे खेळी खेळली, त्यावरुन टीम वर्क काय असते हे दिसले.
मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटलं की, “जगाने भारताला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकताना पाहिले, जो यापूर्वी पारंपरिकपणे काही निवडक देशांकडे जात होतो. त्यामुळे ही अभिमानाची गोष्ट आहे. टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. टीमवर्क आणि ताळमेळ साधणे हे यशाचे सीक्रेट आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सहकार्याशिवाय विजय शक्य नाही. प्रशिक्षक, सपोर्टिंग स्टाफ आणि मार्गदर्शकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे.

