महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांचा क्लीनस्वीप; सर्वच २९ जागांवर विजय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे बहुमतांनी विजयी झाले आहेत. जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ म्हणजे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रविण दरेकरांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची वार्षिक निवडणूक आज रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय, वरळी, मुंबई येथे पार पडली. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया धर्मादाय आयुक्त तथा निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली आहे. या निवडणुकीत अध्यक्ष, १६ उपाध्यक्ष, महासचिव, खजिनदार, कार्यकारी सचिव, व्यवस्थापकीय सदस्य आणि विभागीय सचिव या महत्त्वाच्या पदांसाठी निवड प्रक्रिया झाली आहे. दरम्यान, खजिनदार पदासाठी नाशिकचे ॲड मनोज पिंगळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. विभागीय सचिव या पदासाठी एकूण आठ जागा असून त्यापैकी सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. त्यात नाशिकचे मयूर बोरसे कोल्हापूरचे मंगेश कराळे, लातूरचे ॲड संपत साळुंखे, छत्रपती संभाजीनगरचे अरुण भोसले, पुण्याचे विजयकुमार यादव आणि अमरावतीचे विजय गोटे यांचा समावेश आहे.
निवडणुकीकडे राज्याच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागलेले होते. अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि रणजीत सावरकर यांच्यात थेट लढत झाली होती. अखेर प्रविण दरेकर यांनी यामध्ये बाजी मारली आहे. महासचिव पदासाठी भरतकुमार व्हावळ आणि राकेश तिवारी यांच्यात निवडणूक झाली. कार्यकारी सचिव या पदासाठी शैलेश ठाकूर, सविता बावनथडे आणि प्रशासकीय सचिव पदासाठी महेश सकपाळ व नीलम पाटील यांच्यात लढत झाली. उपाध्यक्ष पदासाठी एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात पंकज भारसाखळे, मुन्ना कुरणे, मिलिंद साळुंके, तुषार रंधे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, शेख गफ्फार अकबर, वैभव वनकर, संतोष आंबेकर, विक्रांत खेडकर, नील पाटील, शाहुराज बिराजदार, अरुण बुटे, जयप्रकाशप दुबळे, अमर भंडारवार, नीलम पाटील, गोपाल देवांग, राजाराम दळवी, विजय सोनावणे यांच्यात लढत झाली.
नवीन कार्यकारिणीवर राज्यातील बॉक्सिंग खेळाचा विकास, स्पर्धांचे नियोजन, खेळाडूंना प्रशिक्षण सुविधा, जिल्हा-अंतरराष्ट्रीय स्पर्धांतील सहभाग आणि धोरणात्मक नियोजनाची मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळं या निवडणुकीकडे क्रीडा वर्तुळाचे लक्ष लागले होते.

