• Sun. Dec 14th, 2025

“बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस…” राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत



“बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस…” राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले ट्वीट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. बाळासाहेबांच्या जुन्या छायाचित्रासह केलेल्या या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू आहे.

स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांची आज सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मोठी गर्दी झाली होती. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मृतीस्थळावर उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन केले.

यानंतर राज ठाकरेंनी केलेले ट्वीट विशेष चर्चेत आले. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर मोठी चळवळ उभी करून त्यातून राजकीय पक्षाला जन्म देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असे ते म्हणाले. पुढे जातीय अस्मिता तीव्र होत असताना आणि भाजपचा कमंडलवाद फोफावण्याच्या आधी हिंदू अस्मिता जागवणारे बाळासाहेबच असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

हिंदुत्वाबाबत बाळासाहेबांचा दृष्टिकोन मांडताना राज ठाकरे म्हणतात की, “बाळासाहेबांनी हिंदूंकडे कधीही मतबँक म्हणून पाहिले नाही. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हा अस्मितेचा आणि धर्माप्रतीच्या प्रेमाचा विषय होता.” प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवादही बाळासाहेबांनी कधीच सोडला नाही, असेही ते म्हणाले.

याच संदर्भातून राज ठाकरे यांनी अप्रत्यक्ष टीका करत “बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित, ना प्रबोधनकार,” अशा शब्दांत टोला लगावला. ऐकण्यावाचनाचा ‘दुष्काळ’ असल्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची समृद्ध मशागत कळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरे पुढे म्हणतात, “फक्त मतं आणि सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करणाऱ्यांचा जमाना असताना समाजकारण आधी आणि त्यानंतर राजकारण हा विचार आमच्यात रुजवणारे बाळासाहेब होते.”
मनसेतर्फे बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करत त्यांनी पोस्ट समाप्त केली.

राज ठाकरेंच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नवीन चर्चांना उधाण आले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें