बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबाला राज्य सरकारकडून गिफ्ट, राजकीय चर्चांना उधाण…
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोर धरू लागले असताना, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबाला मोठी जबाबदारी देत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवे राजकीय समीकरणे आणि चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने औपचारिक शासननिर्णय काढत ही नियुक्ती जाहीर केली.
शासननिर्णयानुसार माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवानेते आदित्य ठाकरे यांची सहा पाच वर्षांसाठी ट्रस्टी म्हणून निवड करण्यात आली आहे. तर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांना तीन वर्षांसाठी ट्रस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे.
याशिवाय पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचाही न्यासात समावेश करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने सुरू असून, नव्या नियुक्त्यांमुळे प्रकल्पाला अधिक दिशा व गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील वर्षभरात हे भव्य स्मारक जनतेसाठी खुले होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे कुटुंबाला दिलेली ही जबाबदारी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, सत्तारूढ पक्ष आणि ठाकरे गट यांच्यातील आगामी राजकीय टक्कर अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

