पालघर जिल्ह्यातील ३.७२ कोटी रुपयांच्या महाचोरांचा पालघर पोलिसांकडून खेळ खल्लास; चोरांना नेपाळ बॉर्डवरून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील ‘नाकोडा ज्वेलर्स’मध्ये झालेल्या तब्बल ३.७२ कोटी रुपयांच्या महाचोरीने खळबळ उडाली असताना, पालघर पोलिसांनी हा गुन्हा उघड करून दाखवला आहे. या चोरीच्या मुख्य सूत्रधारासह एकूण ५ आरोपींना मुद्देमालासह बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे, हे सर्व आरोपी नेपाळचे नागरिक असून, ते भारत-नेपाळ सीमेवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली.
पालघरमध्ये ८ नोव्हेंबरच्या रात्री ‘नाकोडा ज्वेलर्स’ दुकान बंद झाल्यानंतर चोरट्यांनी आपल्या योजनेनुसार काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी शेजारच्या दुकानाचं शटर तोडलं आणि आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाटाच्या दुकानाची आणि ‘नाकोडा ज्वेलर्स’ची भिंत फोडून दुकानामध्ये प्रवेश केला. आत गेल्यानंतर, चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून दुकानातील तिजोरी कापली. या दरोड्यात चोरट्यांनी ५.४ किलो सोनं, ४० किलो चांदी आणि २०लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण ३,७२,३५,४६० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये मॉलचे वॉचमन दीपक सिंग आणि नरेश यांच्यासह त्यांचे नेपाळी साथीदार सामील असल्याचं स्पष्ट झालं. ही माहिती मिळताच, पालघर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करण्यासाठी तात्काळ ७ पथके तयार केली.
पोलीस पथकांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींनी गुजरातमार्गे पळ काढला असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्यांचा माग काढत अत्यंत कौशल्यपूर्णरित्या पाठलाग केला. या कारवाईत, पोलिसांनी उत्तरप्रदेशातील नेपाळ बॉर्डरवरून दीपक नरबहादुर सिंग (२५),भुवनसिंग जवानसिंग चेलाऊने (३७),जिवनकुमार रामबहादुर थारु (४३),खेमराज कुलपती देवकोटा (३९)अर्जुन दामबहादुर सोनी (४४)
यांना अटक करण्यात आली.

