पालघरमध्ये राडा! भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी; भाजपच्या माजी शहराध्यक्षावर विनयभंगाचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजप मधला अंतर्गत कलह उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक आंबुरे आणि भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांच्यामधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी आंबुरे यांच्यावर विनयभंगाचा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर शहरातील लोकमान्य नगर भागात भाजपच्या दोन गटांत झालेल्या राड्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक आंबुरे आणि भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांच्यातील वादाने हाणामारीचे रूप घेतले. पैशाच्या मागणीवरुन हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक आंबुरे यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी १० लाखांची मागणी केली होती, तसेच त्यासाठी नकार दिल्याने आपले तिकीट कापले. शिवाय आता झालेल्या वादात त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आणि विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक आंबुरेसह त्यांच्या साथीदारांवर विनयभंगासह विविध कालमान्वये पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ ठरले असून दोन्ही गटांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना या राड्याचा भाजपच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अशोक आंबुरे यांची पत्नी रोहिणी आंबुरे ह्या वॉर्ड क्र १४ मधून नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत.

