सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाकडून मदत – राज ठाकरे
मतदानाच्या काही तास आधीच राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगावर संतापले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी काही तासांचा अवधी राहिला असताना दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असून निवडणुकीबाबतचा गोंधळ असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मतदारांशी संपर्क साधण्याची मुभा दिली आहे. तर, दुसरीकडे ‘पाडू’ या मतदान मशीनवरूनही वादाची ठिणगी पडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी कुटुंबासह राज ठाकरे यांचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर पोहोचले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या उपस्थितीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोप राज यांनी केला.
राज ठाकरे यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने सांगितले होते की, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार मतदारांना भेटू शकतात. मात्र, ते पत्रक वाटू शकत नाही. मग काय पैसे वाटू शकतात का असा सवाल त्यांनी केला. आपण आतापर्यंत अनेक निवडणूक पाहिल्या. आता ही नवी प्रथा, कुठून आली, कशी आली माहित नाही. हे नवीन नियम कसे अचानक आले असा सवात त्यांनी केला. सरकारला जे हवंय ते निवडणूक आयोग करू देत आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना जिंकण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी पाडू नावाचं मशीन का आणलं, असा सवाल केला. या बाबत कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलं नाही. ही मशीन काय आहे, कोणालाही काहीच माहित नाही. राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं गेलं नसल्याचे त्यांनी म्हटले. पाडू हे नवीन यंत्र ईव्हीएमला पूरक असणार आहे. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानंतरही मतदान प्रक्रिया खोळंबली जाणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भाजप शिंदेंकडून पैसे वाटले जात आहेत. अनेक व्हिडीओ बाहेर येत आहेत… लोक हे पैसे नाकारत आहेत हे देखील चांगलं असल्याचे त्यांनी म्हटले. पुढचे दोन दिवस शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांनी सतर्क राहावे अशी सूचना देण्यात आल्याचे राज यांनी सांगितले.

