विधानसभेला पत्नीचा पराभव, बीएमसीमध्ये लेकही हरली, शिंदे गटाच्या खासदार रविंद्र वायकर यांना डबल धक्का
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून मतमोजणीच्या फेऱ्यागणिक मोठा उलटफेर झाला आहे. सुरुवातीच्या मतमोजणीच्या कलात महायुती आघाडीवर असून ठाकरे गट-मनसे हे पिछाडीवर राहिले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर-पोतनीस यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
शिंदे गटाच्या दिप्ती वायकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी पराभव केला. रविंद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला होता. त्यानंतर विधानसभेत पत्नी आणि आता बीएमसीमध्ये मुलगी पराभूत झाली.
यापूर्वी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचाही याच परिसरात अत्यंत निसटता पराभव झाला होता. दीप्ती वायकर यांच्या रूपाने वायकर कुटुंबाने पुन्हा एकदा या मतदारसंघावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मतदारांनी त्यांना कौल दिला नाही.
जोगेश्वरी पूर्व हा भाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. इथे ठाकरे गटाच्या उमेदवाराने दीप्ती वायकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते.

