दारु पिऊन कामावर आलात तर सस्पेंड करेन – प्रताप सरनाईक
परळ एसटी डेपोत दारुच्या बाटल्या पाहताच प्रताप सरनाईक संतापले; कर्मचाऱ्यांना कडक इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी परळ येथील एसटी डेपोला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान डेपो परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलच सुनावले. “दारू पिऊन कामावर आलात तर थेट निलंबन करेन,” असा स्पष्ट इशारा सरनाईक यांनी दिला.
पाहणीदरम्यान काही कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर आल्याचा संशय व्यक्त होताच, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, डेपोमध्ये ब्रिथ अॅनालायझर मशीनचा तातडीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एखादा कर्मचारी दारूच्या नशेत आढळल्यास त्याला गाडी चालवण्यास परवानगी देऊ नये आणि लगेच शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ड्रायव्हर फ्रेश नसेल, त्याची तब्येत ठीक नसेल तर अपघात होण्याची शक्यता वाढते. प्रवाशांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असे ठणकावून सांगत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी डेपोतील स्वच्छतेच्या दुरवस्थेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी येणार म्हणून तात्पुरती स्वच्छता केली जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती बिकट आहे,” असा टोला लगावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे, स्वच्छतागृहांची तातडीने पूर्तता करण्याचे आणि याबाबत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले. तसेच बस फेऱ्यांमध्ये वाढ करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

