• Thu. Apr 2nd, 2026

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं?



शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं?

दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा तारीख पे तारीख

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाला अद्याप मुहूर्त लागत नसल्याचं चित्र आहे. गुरूवारी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. त्यानंतर आता या याचिकेवर सुनावणी पुढच्या तारखेला होणार आहे. ती सुनावणी नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे हे मात्र अद्याप निश्चित नसून सर्वोच्च न्यायालयाकडून ते दोन्ही पक्षकारांना नंतर सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी संपली. या दरम्यान, शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटाकडून अंतिम युक्तिवादाची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यावर पुढच्या तारखेला सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेच्या अंतिम युक्तिवादासाठी पुढची तारीख ही उपलब्धतेनुसार देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद वाचून पुढील तारीख निश्चित करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २०२२ साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने नवीन सरकार स्थापन केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि “धनुष्यबाण” हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” हे नाव आणि “मशाल” हे नवीन चिन्ह देण्यात आले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें