• Mon. Jun 15th, 2026

धावत्या रिक्षावर झाड कोसळले, १४ वर्षीय मुलीचा करुण अंत तर दुसरी उपचारासाठी अतिदक्षता विभागात



धावत्या रिक्षावर झाड कोसळले, १४ वर्षीय मुलीचा करुण अंत तर दुसरी उपचारासाठी अतिदक्षता विभागात

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – एका खाजगी इमारतीच्या आवारातील मोठे झाड अचानक एका धावत्या ऑटो रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत रिक्षात प्रवास करणाऱ्या १४ वर्षांच्या एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाला आहे.तर दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. मुंबईतील खार परिसरात ही अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

खार येथील ‘ब्लू स्टोन बिल्डर’ या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये हे झाड होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, झाड कोसळल्याचा वेग आणि वजन इतके जास्त होते की, खाली असलेल्या रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या रिक्षातून प्रवास करणाऱ्या दोन्ही मुली गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने १४ वर्षांच्या अरिका श्रीवास्तव या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर २१ वर्षांची हर्षिता कुमार ही मुलगी गंभीर जखमी आहे. तिच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पावसाळा तोंडावर आलेला असताना किंवा हवेतील बदलांमुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे मुंबई महानगरपालिका आणि खाजगी इमारत प्रशासनाच्या झाड छाटणीच्या धोरणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. खाजगी आवारातील झाडांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या छाटणीची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालिकेने अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून वेळीच कारवाई केली असती, तर आज एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें