राहुल नार्वेकर यांच्या सूचनेला बेस्ट समितीचा नकार; गेट वे ऑफ इंडिया येथील बसथांबा स्थलांतराचा प्रस्ताव फेटाळला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसथांबा स्थलांतरित करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या सूचनेला बेस्ट समितीने नकार दिला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील बेस्ट बस वाहतूक मार्ग बदलून बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर हलवण्याचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला सदस्यांनी जोरदार विरोध करत तो प्रशासनाकडे परत पाठवला.
समिती सदस्यांनी सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खासगी वाहने आणि टॅक्सीचालकांना प्राधान्य देणारा हा प्रस्ताव असल्याचा आरोप केला. त्यामुळे दररोज बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या हिताला धक्का बसू शकतो, असं मत व्यक्त करत हा प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ११ मार्च २०२६ रोजी बेस्ट प्रशासनाला पत्र लिहून गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येत असल्याचं नमूद केलं होतं. या भागात वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी होत असल्यानं विद्यमान बसथांब्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.नार्वेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बस मार्ग बदलून विद्यमान बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय समोरील योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची विनंती केली होती. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ही सूचना करण्यात आल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.
राहुल नार्वेकर यांच्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाकडून संबंधित प्रस्ताव महापालिकेच्या बेस्ट समितीसमोर मांडण्यात आला. मात्र चर्चेनंतर हा प्रस्ताव सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रतिकूल ठरू शकतो, असं मत नोंदवत समितीने त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवण्यात आला आहे.

