ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बविआच्या ७१ मतांना सोन्याचा भाव; शिंदे गट-भाजपकडून ठाकुरांची मनधरणी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – सध्या महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये ठाण्यातील विधान परिषदेच्या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात एक वेगळ्याच प्रकारचे शह- काटशहाचे राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपकडून प्रेशर टॅक्टिक्सचा वापर केला जात आहे. ठाण्याची विधानपरिषद जागा संख्याबळानुसार भाजपला हवी होती. मात्र आतापर्यंतच्या जागावाटपाच्या झालेल्या चर्चेत ही जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, आता शेवटच्या क्षणी ठाण्यातील स्थानिक भाजप नेत्यांच्या महत्वाकांक्षेने उचल खाल्ली असून आता भाजपने पडद्यामागून ही जागा जिंकण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या रस्सीखेचीत वसई-विरार महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीचा भाव चांगलाच वधारला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाचा विचार करता ठाणे विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. याठिकाणी भाजपचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. मात्र, ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. शिंदे गटाचे रवींद्र फाटक हे ठाणे विधानपरिषदेतील माजी आमदार आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा शिवसेनेलाच मिळावी,अशा शिंदे गटाचा आग्रह आहे. भाजपला काही प्रमाणात शिंदे गटाचा हा आग्रह मान्यही आहे. मात्र, आता शेवटच्या क्षणी भाजपमधील स्थानिक नेत्यांना ठाणे विधानपरिषदेतून आपला आमदार निवडून आणण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी शिंदे गटाला बविआकडे असणाऱ्या ७१ मतांची अत्यंत गरज आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे विधान परिषदेचे संभाव्य उमेदवार रवींद्र फाटक हे भाई ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांना भेटले. रवींद्र फाटक यांनी विधानपरिषदेत पाठिंबा मिळावा, यासाठीच ही भेट घेतल्याचे समजते. या भेटीनंतर शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते.
मात्र, आता भाजपचे स्थानिक नेतेही ठाणे विधानपरिषदेच्या जागेवरुन अडून बसले आहेत.पक्षविस्तारासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आता नाही तर ठाणे विधानपरिषदेवर आपला आमदार कधी निवडून आणायचा, एवढे नगरसेवक आपण कशासाठी निवडून आणले आहेत? असा सवाल भाजपचे स्थानिक नेते विचारत आहेत. त्यासाठी भाजपने आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या बविआशी पडद्यामागून बोलणी सुरु केल्याची चर्चा आहे. भाजप खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक या दोघांनी बविआचे माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत भाजपच्या नेत्यांनी बविआला विधानपरिषद निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे समजते.
गेल्या काही काळात भाजपने ठाणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. सध्या भाजपकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ४४४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर शिवसेनेकडे ३४६ मतं आहेत. बविआची ७१ मतं बाजूला ठेवलं तरी भाजपचं पारडं जड आहे. मात्र, ही मतं शिंदे गटाच्या बाजूला वळाल्यास आणि इतर मतांची जुळवाजुळव झाल्यास समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बविआ केंद्रस्थानी आला आहे.

