लग्नाचे आमिष, १५ लाखांची फसवणूक आणि जबरदस्ती गर्भपात; ठाण्यात चेतन लोखंडेविरोधात गुन्हा
ठाणे / प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहरातील कासारवडवली पोलीस ठाणे येथे एका महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, आर्थिक शोषण, जबरदस्ती गर्भपात आणि अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी चेतन संतोष लोखंडे याच्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घोडबंदर रोड परिसरात राहणारी असून ती नवी मुंबईतील हॉटेलमध्ये गायिका म्हणून काम करत होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये घणसोली येथील एका हॉटेलमध्ये तिची ओळख चेतन लोखंडे याच्याशी झाली. त्याने स्वतःला मोठा व्यावसायिक असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला.
तक्रारीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये चेतन महिलेला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला असता, घरात प्रवेश करून त्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर लग्नाचे आश्वासन देत त्याने महिलेला शांत केले, असा आरोप आहे.
यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने महिलेला अजमेर, खाटू श्याम मंदिर आणि उज्जैन येथे फिरायला नेले. ८ ऑगस्ट २०२५ रोजी महाकाल मंदिर परिसरात हिंदू विधीनुसार विवाह केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर दोघे ठाण्यात पती-पत्नीप्रमाणे राहत होते.
महिलेच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर आरोपीने ‘एस. एन. लॅब’ची नवीन शाखा सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून तिच्याकडून १५ लाख रुपये घेतले. मात्र ही रक्कम परत करण्यात आली नाही.
नोव्हेंबर २०२५ मध्ये महिला गर्भवती झाल्यानंतर आरोपीने मूल नको असल्याचे सांगितले. त्यानंतर फसवणुकीने औषध देऊन जबरदस्ती गर्भपात घडवून आणल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये आरोपी आधीपासून विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती महिलेसमोर आली. याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीने ते मान्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित केल्याची धमकी दिली. पोलिसांत तक्रार केल्यास किंवा संबंध तोडण्याचा प्रयत्न केल्यास हे व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपी फरार झाला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी २३ मे २०२६ रोजी चेतन संतोष लोखंडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, महिलेवरील क्रूरता, जबरदस्ती गर्भपात, गुन्हेगारी धमकी आणि महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचविण्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बापूराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, ही माहिती पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवर आधारित असून, प्रकरणातील सत्यता पुढील पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.

