मुख्यमंत्र्यांनंतर जयंत पाटील यांची एकनाथ शिंदेंची भेट; ठाण्यातील ‘नंदनवन’मध्ये रंगल्या राजकीय चर्चा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे भेट घेतली. या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या बैठकींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, ‘नंदनवन’ येथे नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वी बुधवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही ‘वर्षा’ येथे उपस्थित असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला होता.
या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी सांगितले की, इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अवघी पाच मिनिटे चर्चा झाली असून, आपल्या भेटीचा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते तेथे उपस्थित असल्याची माहितीही आपल्याला नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, दोन दिवसांत झालेल्या या सलग राजकीय भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, संबंधित नेत्यांकडून त्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

