‘गणेश नाईकच्या नादाला लागला तर जागा दाखवीन’; क्लस्टर योजनेवरून शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : राज्यातील क्लस्टर पुनर्विकास योजना आणि नव्या यूडीसीपीआर (UDCPR) धोरणावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देणार नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी इशारावजा भूमिका मांडली.
नाईक यांनी, ३० वर्षे पूर्ण न झालेल्या किंवा अतिधोकादायक नसलेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच, नव्या यूडीसीपीआरनुसार नवी मुंबईतील सर्व इमारतींचा एफएसआय वाढल्यास शहराच्या नियोजनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महायुती सरकारमध्ये क्लस्टर योजनेवरून मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

