• Thu. Oct 8th, 2026

शासकीय महाविद्यालयातील मोदींचा फोटो हटविल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हा



शासकीय महाविद्यालयातील मोदींचा फोटो हटविल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हा

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कँटीनची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, मेस आणि स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला. कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर अमित ठाकरे यांनी सोबतच्या कार्यकर्त्याला फोटो काढण्यास सांगितले. कार्यकर्त्याने मोदींचा फोटो भिंतीवरून काढला. या प्रकाराला प्राचार्यांनी विरोध केला असता ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी उद्धटपणे वागून फोटो जबरदस्तीने काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच कार्यालयात घोषणाबाजी करून, आठ दिवसांत दिलेल्या सूचनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा कार्यालयात येऊन आंदोलन करण्याची धमकी दिल्याचा आरोपही प्राचार्यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांची छायाचित्रे लावण्याबाबत नियम असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राशेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो का लावण्यात आला, असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला होता. या प्रकारावरून भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें