वानखेडेवरील स्टँडला शरद पवार, रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांचे नाव
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – वानखेडे स्टेडियममध्ये शुक्रवारी एक भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थिती होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण झाले. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उद्घाटन झाले. रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशन माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचंही स्टँड दिसणार आहे. त्यासह भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला दिले गेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक पर्व सुरू होणार आहे. वानखेडे स्टेडियम, जिथे रोहितने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, तिथे आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखले जाणारे स्टँड असेल. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत आणि रोहितचे नावही त्या यादीत जोडल्या गेले आहे.
वानखेडे स्टेडियमवरील पॅव्हेलियनच्या तिसऱ्या लेव्हलला रोहितचे नाव देण्यात येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आहे. जरी त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे यश कायमचे अमर राहील. मुंबईसाठी त्याने ४६ प्रथम श्रेणी सामने, १७ लिस्ट ए सामने आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. एक स्टायलिश नंबर ३ फलंदाज आणि भारताच्या सर्वोत्तम स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक, अजित वाडेकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक परदेशातील कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले. त्यांनी १९६६ ते १९७४ दरम्यान ३७ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आणि १९५८-६९ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. ऑगस्ट २०१८ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तर शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि २०११ चा वर्ल्ड कप भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.