ठाकरे बंधू आणि शरद पवार – अजित पवार एकत्र येत असतील तर रामदास आठवले अन् प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागणारच
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं की, तुम्हाला शिवसेना चालते तर भाजप का चालत नाही? शरद पवार साहेबांसारखा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांद्या लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सोबत आले असते तर शरद पवार या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. मात्र, अजूनही ती वेळ गेलेली नाही. शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी म्हटले.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल. तरी मला अस वाटतं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.