मुरबाड नगरपंचायतीत भाजपला मोठा धक्का !
१० पैकी ९ नगरसेवक फुटल्याने भाजपचे वर्चस्व संपुष्टात; मुरबाड परिवर्तन पॅनल ला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता
योगेश पांडे / वार्ताहर
मुरबाड – मुरबाड नगरपंचायतीतील दहा नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्या गटाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे वर्चस्व संपुष्टात आले असून, स्थानिक आमदार किसन कथोरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार किसन कथोरे यांचा प्रभाव असला, तरी नगरपंचायतीत गेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. एकूण १७ नगरसेवकांपैकी भाजपचे १०, शिवसेनेचे ५, तर अन्य दोन अपक्ष नगरसेवकांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आले. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले. आमदार कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. प्रत्यक्ष निवडणुकीत काही नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करत भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला.
या घडामोडीनंतर भाजपचे नऊ नगरसेवक एकत्र येत ‘मुरबाड परिवर्तन पॅनल’ स्थापन करण्यात आला. २६ मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला होता. अखेर ९ जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या पॅनलला स्वतंत्र गटाची मान्यता दिली. यामुळे आता मुरबाड नगरपंचायतीत भाजपकडे फक्त एक नगरसेवक आणि दोन समर्थक नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे पक्षाचे स्थानिक राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे.