निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा; सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं, जयंत पाटील यांचं आवाहन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांकडून मुंबईत १ नोव्हेंबरला विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की शिवसेना भवनच्या पाचव्या मजल्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात. मात्र, त्यांच्या ऐवजी आज आपण पत्रकार परिषद घेतोय. महाराष्ट्र निर्माण सेनेचा संपूर्ण कॅबिनेट येथे आले आहे. बाळा नांदगावकर म्हणतात मी २४ वर्षांनी आले पानसे म्हणतात ११ वर्षांनी आलोय. गेल्या काही दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोगा विरोधात लढाई लढतोय. यातून काय निष्पन्न होईल माहित नाही. महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा आहे.
निवडणूक यादीत घुसलेले १ कोटी मतदार बाहेर काढा असं आवाहन अमित शाह यांना करतो, असं संजय राऊत म्हणाले. ते पुढं म्हणाले की मंदा म्हात्रे, विलास भुमरे यांचा वक्तव्य आम्ही ऐकलं आहे. दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी आमदार सांगतात. संजय गायकवाड सुद्धा यावर बोलताय, असं राऊत म्हणाले.
मतदार याद्या पवित्र असायला हव्यात… त्यासाठी सर्व प्रमुख पक्ष लढत आहेत.१ नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा निघेल. या मोर्च्याच्या नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आणि काँग्रेस चे जेष्ठ नेते करतील. १ नोव्हेंबर हा महाराष्ट्र साठी महत्वाचा आणि लोकशाही महत्वाचा असेल, असंही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात मोर्चा होणार आहे असाच मोर्चा हा दिल्लीत झाला होता. त्याला सर्व नेते उपस्थित होते. हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नये. प्रत्येकाचा पाठींबा या मोर्चाला आहे, असंही संजय राऊत म्हणाले.