भाजप खासदार निशिकांत दुबेंकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती, खारमध्ये करोडोंचा फ्लॅट; सचिन अहिरांची विधानपरिषदेत माहिती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधान परिषदेत आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी समोर आणली आहे. निशिकांत दुबे यांचा खारमध्ये झुलेलाल येथे करोडो रुपयांचा फ्लॅट असल्याचे अहिर म्हणाले. स्वत: इथं राहत नाहीत, भाड्याने देऊन इथं इन्व्हेस्ट करत असल्याचे अहिर म्हणाले. मुंबईत मराठी लोकांना राहिला घरे नाहीत, माझगावमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात मराठी माणसं राहत होती. मात्र, आता इथे जेवढे विकासक आले आहेत ते बांधकाम सुरू करण्यापूर्वीच इथे जैन मंदिर बांधतात. त्यामुळं दुसरा माणूस बिल्डिंगमध्ये जाऊच शकत नाही. यामुळं सामाजिक तेढ होत असल्याचे अहिर म्हणाले. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासमध्ये सरकारने मराठी लोकांना घरे मिळण्यासाठी आरक्षण टाका, असी मागणी अहिर यांनी सभागृहात केली.
मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे.