रमीच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी; दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली आणि दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.मंगळवारी दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज मी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे, असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.
तर पुढे भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. मी पूर्णपणे मदत करेन असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते मी करणार आहे, अशी ग्वाही देखील भरणेंनी दिली आहे, तर राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच कृषी विभागातील एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या १४ जणांची नियुक्ती करणाऱ्या पत्रावर त्यांनी सही केली आहे.
राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान केलं, त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तर अनेकांनी या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलंय.