राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला; मनसे आणि शिवसेना आपल्या दोघांचीच मुंबईत ताकद, कामाला लागा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एमआयजी क्लब येथे मनसे नेते, शहराध्यक्ष, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष हे सगळे बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही, त्यामुळे कामाला लागा अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे गटाध्यक्षांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा, मतदार याद्या तपासा या सूचना मनसे अध्यक्ष मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबई महापलिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने काही सूचना राज ठाकरे यांनी गुरुवारच्या या बैठकीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. मतदार यादीतील घोळ हे २०१७ पासून सांगत आहोत, आता बाकीच्यांनी हा विषय घेतलाय, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कबुतरखान्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल. जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे. कबुतरांमुळे काय काय रोग होतात ते ही समजलं पाहिजे. कबुतरांना खायला घालू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असं राज ठाकरेंनी सांगितले. काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं आहे. जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबुतरखान्याजवळ आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, असंही राज ठाकरे म्हणाले. कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही काही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. यादरम्यान, राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखे माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले.