गोव्यात भाजपाच्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; विधानसभा अध्यक्षही पद सोडणार; सत्ताधारी गोटात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
पणज – गोवा सरकारमधील पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बुधवारी अचानक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे त्यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र सुपूर्द केलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच रमेश तवडकर यांनीही गोव्याचे विधानसभा अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांनी अचानक राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने सत्ताधारी गोटात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला. तसेच रमेश तवडकर यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडण्याची घोषणा का केली.
काही दिवसांपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार, अशी चर्चा गोव्यातील राजकीय वर्तुळात रंगली होती. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून एका मंत्र्याला मंत्रिपद सोडण्याचे आदेश आले आहेत, अशी कुजबुज सत्ताधारी गोटात सुरू होती. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. दामू नाईक यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी तासभर चर्चा केली आणि अधिवेशनातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा सादर केला. त्यानंतरच सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.