ठाकरे बंधूंच्या युतीकडे पाऊल: मुंबईत २ फॉर्म्युल्यांवर चर्चा, जागांची विभागणी ठरवण्याचे आदेश!
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये युती होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. दिवाळीत या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी चर्चा आहे. यासाठी मुंबईत समसमान जागावाटप आणि उपनगरांमध्ये ६०-४० चा फॉर्म्युला राबवण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी स्वतंत्र फॉर्म्युला ठरवण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका ही दोन्ही ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांना ठाकरे ब्रँड’च्या सामर्थ्याची कसोटी यातून द्यावी लागणार आहे.
जागांची लढत कशी?
मुंबई महापालिकेचे एकूण २२७ प्रभाग आहेत.
उद्धवसेनेनं आतापर्यंत १४७ जागांवर दावा केला आहे.
मनसेला ८० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेची आहे.
मात्र, मनसेने तब्बल ९५ जागांचा आग्रह धरला आहे.
२०१७ च्या निवडणुकीत शिवसेना – ८४ जागा, भाजप – ८२ जागा, मनसे – ७ जागा
२०१२ मध्ये मनसेची सर्वोच्च कामगिरी – २८ नगरसेवक विजयी
२०२२ मध्ये शिंदे गटाच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसला. अनेक नगरसेवक शिंदे गटात गेले. दादर-माहीम, परळ, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर, भांडूप, दहिसर या मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) आणि मनसे दोन्ही पक्षांची ताकद आहे. त्यामुळे या भागात समान वाटणी होणार आहे. उर्वरित प्रभागांमध्ये एकमेकांच्या ताकदीच्या आधारे उमेदवारी ठरवली जाईल.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना मुंबईतील जागांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या याद्या एकत्र करून अंतिम फॉर्म्युला ठरवला जाणार आहे. सूत्रांच्या मते, दिवाळीत मोठी घोषणा होऊ शकते.