पहिल्याच दिवशी मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचा खोळंबा
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गिकेच्या पहिल्याच टप्प्यात मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. मरोळ स्थानकावर ही मेट्रो तब्बल पाच ते सात मिनिटं उभी राहीली त्याशिवाय अचानक मेट्रोचे दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांना मेट्रोबाहेर जाताही येत नव्हतं. सकाळी खोळंबा झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे. त्यामुळे याची मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे. शहराच्या वर्दळीच्या भागातून ही मेट्रो जाणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांची ट्रॅफिक जाम आणि लोकलच्या गर्दीतून सुटका होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं आहे. पहिल्या टप्प्यात १२. ४४किलो मीटरच्या अंतरावर मेट्रो धावणार आहे. यामध्ये १० स्टेशन असून यातील नऊ स्थानके ही अंडर ग्राउंड आहेत तर १ स्थानक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहेत. २०११ मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा प्रकल्प पूर्णत्वास आला मेट्रो कारशेडचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. २२ हेक्टर जागेवर ते साकारले आहे. आज मेट्रो-३ प्रकल्पाची किंमत ३६ हजार कोटी झाली आहे. आरेमधील कारशेडला झालेला विरोध त्या भोवतीच्या राजकारणामुळे मेट्रोची किंमत वाढली.