• Sun. Oct 19th, 2025

रायगडावरील घटनेची मुंबईत पुनरावृत्ती , दादा-भाईंना झटका, दोघांच्याही नाराजीच्या चर्चा



रायगडावरील घटनेची मुंबईत पुनरावृत्ती , दादा-भाईंना झटका, दोघांच्याही नाराजीच्या चर्चा

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. सत्ता वाटपापासून ते निधी वाटपामुळे महायुतीत वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे नेते मंडळींकडून ऑल इज वेल असल्याचा दावा केला जात आहे. महायुतीमध्ये नाराजीची तेढ वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांचे नियोजित भाषण रोखण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. सोमवारी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. हा शासकीय कार्यक्रम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदींसह इतर मंत्री, नेते मंडळी उपस्थित होते.

राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे भाषण नियोजित होते. नियोजित कार्यक्रमामुळे त्यांचे भाषण ही तयार होते. पण ऐन वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आल आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच भाषण नियोजीत करण्यात आले.

चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ऐनवेळी प्रोटोकॉल बदलणारा शुक्राचार्य कोण? याचा शोध घेणे सुरू आहे.दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालयातून शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे भाषण करू न देण्याचा प्रयत्न म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे खच्चीकरण करण्याचा डाव कोणाचा? याची चर्चा सुरू झाली आहे. चैत्यभूमीवर झालेल्या प्रकारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर त्यांनी तात्काळ तिथून पाय काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली. तर, अजित पवारांनी ती संधी नाकारल्याचे म्हटले जात होते.मुंबईत मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी नाकारण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें