• Sun. Oct 19th, 2025

तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल



तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल

लोणी काळभोर – राज्यात फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक फसवणुकीची घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. लोकांच्या अशिक्षित तसेच अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन तसेच वकील असल्याचे खोटे सांगून कांबळे हिने आतापर्यंत तिघांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आणखी काही फसवणुकीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारामुळे लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वकील असल्याचे खोटे सांगून सुनेपासून मुलाला घटस्फोट मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची पाच लाख ३० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सुजाता अशोक गायकवाड (वय ६५, रा. लोहिया नगर) यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहल कांबळेविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. कांबळे ही सध्या पोलीस कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल कांबळे हिने तक्रारदार महिलेला वकील असल्याचे भासविले. त्यानंतर त्यांच्या मुलाला त्याच्या पत्नीपासून सोडचिठ्ठी घेऊन देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी रोख स्वरूपात पैसे घेतले. त्यानंतर वेळोवेळी अटकेची भीती घालून त्यातून सोडविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदार महिलेकडून पैसे उकळले. आरोपी कांबळे हिने तक्रारदार महिलेची पाच लाख ३० हजारांची आर्थिक फसवणूक केली. कांबळेविरुद्ध आर्थिक फासवणूक तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल कांबळे हिने पहिल्या घटनेत, मुलाला सुनेकडून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि सुनेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे असे खोटे सांगून कडू सातपुते या शेतकऱ्याकडून सुमारे सहा लाख रुपये उकळले. दुसऱ्या घटनेत मंदा लांडगे यांच्या मुलीस न्याय मिळवून देऊन तिच्या मुलांना परत मिळवून देते अशी बतावणी करीत एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली.

आरोपी स्नेहल कांबळे या महिलेचा वकीलीचा व्यवसाय नाही. मात्र वकील असल्याचे भासवून तिने बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. घटस्फोट, चोरी, बलात्कार यांसारख्या प्रकरणात ती लोकांना अटकेची भीती घालत असे. तसेच पोलिसांत ओळख असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे, प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. तसेच ज्या नागरिकांची या तोतया वकील महिलेने फसवणुक केली आहे. त्यांनी निर्भीडपणे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पन्हाळे यांनी केले आहे. कडू सातपुते या शेतकऱ्याकडून खंडणी स्वीकारताना लोणी काळभोर पोलिसांनी स्नेहल कांबळेला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी तिच्याकडे अनेक गुन्ह्यांच्या एफआयआर कॉपी, तक्रार अर्ज, प्रॉपर्टीचे पेपर्स तसेच काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली होती. त्याबाबत पोलीस तपास करीत आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें