• Sun. Oct 19th, 2025

पुणे अपघात प्रकरण; १२ विद्यार्थ्यांना उडवणाऱ्या कार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, आरोपी विरोधात सर्व पुरावे न्यायालयासमोर



पुणे अपघात प्रकरण; १२ विद्यार्थ्यांना उडवणाऱ्या कार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी, आरोपी विरोधात सर्व पुरावे न्यायालयासमोर

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. कारचा चालक जयराम मुळे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी चालकाला रविवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले होते. आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असताना त्याने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सर्व तांत्रिक पुराव्यासह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली आहे. दारुच्या नशेत जयराम मुळे याने काल चहा पिण्यासाठी थांबलेल्या १२ जणांना उडवले होते. यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. हा कार चालक दारु पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे. दारु पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही घटना घडली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. तर नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातील भावे हायस्कूलचा परिसर म्हणजे अरुंद रस्ते आणि छोटी गल्ली असलेला परिसर आहे. असं असतानाही कार चालक भरधाव वेगाने आला. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोर चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांना त्याने उडवलं. जखमींमध्ये तीन मुलीही असल्याची माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासणे उपस्थित राहिले. हेमंत रासणे यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे. दरम्यान, अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विद्यार्थ्यांशी बातचीत करुन दिली. जी मदत लागेल ती आम्ही करु असे आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें