गिरीश महाराज म्हणजे नाच्या, राजकारणातील दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे दलाल – संजय राऊत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केलं होतं. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणाले की, गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले आहेत. हातात पोलीस आहे, पैसे आहे. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, असा हल्लाबोल त्यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या चौकशी सुरू झाल्या होत्या. तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते. महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशी सुरू होत्या. तेव्हा हेच निरोप पाठवत होते की, मी राजकारणातून बाहेर पडतो. मी शांत बसतो. हे डरपोक आणि गांX लोक आहेत, असे त्यांनी म्हटले. प्रत्येकाची वेळ येते. आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची जी भाषा तुम्ही वापरत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणात कोण होतात? आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभे राहून फोटो काढत होते, त्यावर आमचे लक्ष आहे. गिरीश महाजन जे बोलत आहेत, त्यांची भाषा त्यांच्या पक्षाला बुडवणार, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
महाजनांच्या दहा पिढ्या उतरल्या तरी….
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शाह यांनी तर शिवसेना संपवण्यासाठी जंगजंग पछाडलं. अमित शाह यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. महाराष्ट्र संपवण्यासाठी ही शक्ती आहे त्याचे गिरीश महाजन हे हस्तक आहेत. मराठी द्रोही, महाराष्ट्र द्रोही हे लोक आहेत. हे आम्हाला संपवणार? आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे. शिवसेना संपवणे हे गिरीश महाजनांच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. पाच-पंचवीस माणसं फोडणं म्हणजे पक्ष फोडणं असतं का? नरेंद्र मोदी पण काँग्रेसमुक्त भारत म्हणत होते. त्यांच्याच काळात काँग्रेस जास्त वाढली. त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला. त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून भारताची भूमिका मांडायला लागली. गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे. ही नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, असा घणाघात देखील त्यांनी केला.