विधानसभा निवडणुकीत ७६ लाख लोकांच्या नियमबाह्य मतदानाचा आरोप; प्रकाश आंबडेकरांच्या याचिकेवर २५ जूनला निकाल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या नियमबाह्य मतदानाच्या आरोपांच्या याचिकेवर सुनावणी झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर ७६ लाख लोकांना मतदान केल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आता २५ जूनला निकाल जाहीर होणार आहे. याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, ‘सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झालेल्या ७६ लाख मतांच्या प्रकरणाची सुनावणी केली. यावेळी माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि निकाल २५ जून जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर ७६ लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आंबेडकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत आणि यावर्षी ५ नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत आहे असे नमूद केले होते. प्रकाश आंबेडकर यांनी सायंकाळी ५ नंतर झालेल्या मतदानाचा व्हिडिओ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नाही असाही आरोप केला होता. यानंतर आता २५ जूनला यावर निकाल जाहीर होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ जागांपैकी २३५ जागा जिंकल्या होत्या. तर महाविकास आघाडीला ४९ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला १३२, शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीत काँग्रेसला १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १० आणि शिवसेनेला (यूबीटी) २० जागा मिळाल्या होत्या.