कुख्यात गुंड युवराज माथनकर शिवसेनेत;एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर वेगवेगळे पक्ष प्रवेश घडवून आणत पक्षबांधणी केली जात आहे. दरम्यान, एका सराईत गुंडाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा सगळा प्रसंग कॅमेरात कैद झाला आहे. यात युवराज माथनकर हा एकनाथ शिंदे यांच्या पाया पडताना दिसत आहे. त्याने शिंदेंच्या पाया पडून शिवसेनेत प्रवेश केला. युवराज माथनकर याच्यावर लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामुळे तो काही वर्षे तुरुंगातही देखील राहिला आहे. त्याच्या टोळीवर मकोका सुद्धा लागला होता. पण अलीकडे त्याची काही गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती आहे.
मात्र, नागपुरात आजही बरेच लोक त्याला एक सराईत गुंड म्हणून ओळखतात. त्याच युवराज माथनकरला रविवारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश घेणाऱ्यांच्या गर्दीत युवराज माथनकर देखील होता. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याने प्रवेश घेतल्याचं फेटाळलं आहे. प्रवेश घेतल्यानंतर तो त्या ठिकाणी जास्त वेळ थांबला नाही. लगेच निघून गेला. कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता स्थानिक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी करतात. त्यामुळे कोणी वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही, याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायची असते, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.