हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानतो, परंतु राज्यांच्या मातृभाषेलाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे – दिग्विजय सिंह
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रावरून रणकंदनावर काँग्रेसच्या हिंदीभाषिक नेत्याचे स्पष्ट मत
योगेश पांडे / वार्ताहर
तुळजापुर – त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीने शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच इतर विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध झाला. अखेर मराठी भाषेवरील प्रेम आणि जनभावनेपुढे राज्य सरकारला नमते घ्यावे लागले आणि फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय (जीआर) मागे घेतला. यानंतर शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेआणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा घेतला. मराठीसाठी त्यांच्या एकजुटीने जनतेचे लक्ष वेधून घेतले. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी त्रिभाषा सूत्रावर स्पष्ट मत केले आहे. प्राथमिक शिक्षण राज्याच्या मातृभाषेतच व्हायला हवं, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी त्रिभाषा सूत्रावर आपले स्पष्ट मत मांडले असून,ज्या राज्याची मातृभाषा आहे, तिला महत्त्व मिळायला हवं. प्राथमिक शिक्षण राज्याच्या मातृभाषेतच व्हायला हवं, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानतो, परंतु राज्यांच्या मातृभाषेलाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. तब्बल १९ वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत विचारले असता,ही एक चांगली गोष्ट आहे,अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, ३३ वर्षांपासून दिग्विजय सिंह हे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या वारीला येतात. पंढरपूरकडे रवाना होण्याआधी त्यांनी तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिग्विजय सिंह यांना वारीबाबत विचारले असता ते म्हणाले, विठोबा हा देशातील मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा देव आहे. वारीत लाखो लोक सहभागी होतात आणि ती शिस्त ही खरोखरच अद्भुत आहे. विठोबाच्या दर्शनाची हीच खरी शक्ती आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.