टेस्लाचं भारतातलं पहिलं शोरूम मुंबईत! नामफलक ठळक मराठीत
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला शोरूमचं उद्घाटन; मराठी जनतेसाठी अभिमानाची बाब
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला मोटर्सने अखेर भारतात पाऊल ठेवले असून, भारतातील पहिलं अधिकृत टेस्ला शोरूम मुंबईच्या बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) परिसरात सुरु झालं आहे. विशेष म्हणजे, शोरुमच्या प्रवेशद्वारावर टेस्ला हे नाव ठळक मराठीत झळकतंय, ही बाब राज्यात मराठी अस्मितेच्या अभिमानाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरुमचे आज उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर फडणवीस यांनी टेस्ला कारची प्रत्यक्ष पाहणी केली व मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधला.
> “महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही ऐतिहासिक गोष्ट आहे. टेस्ला केवळ शोरूमच नाही तर त्याचं संपूर्ण मेकॅनिझम आणि सर्व्हिसिंग मुंबईत उभं करणार आहे. हे ईव्ही क्षेत्रातील एक भव्य पाऊल आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
ईव्ही क्षेत्रात महाराष्ट्राचं नेतृत्व
फडणवीस यांनी यावेळी ईव्ही क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचाही उल्लेख केला.
> “महाराष्ट्राने ईव्ही साठी जी सवलती दिल्या आहेत – कर, चार्जिंग सुविधा, उत्पादन केंद्रे – त्यामुळेच राज्य हे आज देशात ईव्ही साठी प्राधान्य स्थळ बनले आहे,” असं ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे टेस्ला यासारखी आंतरराष्ट्रीय कंपन्या आता राज्यात गुंतवणूक करत आहेत. ईव्ही धोरणाअंतर्गत मुंबईत टेस्लाचे चार “सुपरचार्जिंग” स्टेशन लवकरच सुरू होणार असून, याशिवाय ३२ चार्जिंग पॉईंट्सचं जाळंही उभारण्यात येणार आहे.
टेस्ला – सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा संगम
टेस्ला कार केवळ ईव्ही नव्हे तर तंत्रज्ञानाचा अजोड नमुना मानली जाते. १५ मिनिटांमध्ये झपाट्याने चार्ज होणारी ही कार तब्बल ६०० किमी धावू शकते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार,
> “जगभरात आजवर टेस्ला कारचा एकही मोठा अपघात घडलेला नाही,” असा अभिमानास्पद रेकॉर्ड आहे.
मराठी नामफलक – सांस्कृतिक अभिमान
मुंबईत इंग्रजी आणि हिंदी पाट्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, टेस्ला कंपनीने नामफलकावर ठळक “टेस्ला” हे मराठीत लिहून एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. यामुळे स्थानिक मराठी जनतेत आनंदाचे वातावरण असून, सोशल मीडियावर याचे कौतुकही होत आहे.