• Sun. Oct 19th, 2025

महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुटला; भाजप ४४, शिंदे गट ३३ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला २३ महामंडळं



महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुटला; भाजप ४४, शिंदे गट ३३ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला २३ महामंडळं

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला ४४, शिंदेंच्या शिवसेनेला ३३, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला २३ असे महामंडळांच्या वाटपावर महायुतीत एकमत झाल्याचे हि समोर आले आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकित महामंडळाबाबत तीनही पक्षात हे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता लक्ष लागले आहे ते कि, महत्वाच्या महामंडळांकडे. कारण सिडको आणि म्हाडासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळाले आहे. परिणामी लवकरच पून्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढील चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुणाच्या वाट्याला कोणते महामंडळ येईल हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूकीपूर्वी महामंडळ वाटप करून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा महायुतीचा हा प्रयत्न असल्याची हि चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे.

दरम्यान, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी महायुती सक्रिय झाली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नाराज आमदारांनी आता महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि आमदारांना योग्य स्थान मिळते. यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेनेच्यावतीने करण्यात आलेली आहे. नुकतीच याबाबतची बैठक रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि इतर मित्र पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत निर्णय झाल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान तिकीट वाटपासंदर्भातले सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर, वरिष्ठ नेते यांच्यामार्फत घेतला जाईल, असं रत्नागिरी शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें