“काय उखडायचं ते उखडा!” – संजय राऊतांचा फडणवीसांना ओपन चॅलेंज; मराठीसाठी आक्रमक लढा देण्याचा इशारा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला आहे. “मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखडायचे ते उखडा,” अशा शब्दांत त्यांनी थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. तसेच मुख्यमंत्रिपद गेल्यावर फडणवीस वेगळा विदर्भ मागणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
फडणवीसांवर थेट आरोप
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, हे महाराष्ट्र आहे, हे राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणसांचं आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलंय. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून गप्प आहात, पण ज्या दिवशी तुमचं मुख्यमंत्रिपद जाईल, त्या दिवशी तुम्ही वेगळा विदर्भ मागाल.”
‘खोक्याची भाषा करू नये’ – टोला फडणवीसांना
मराठीच्या मुद्द्यावर हिंसाचारासंबंधी फडणवीसांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “फडणवीसांचं सरकार खोक्यांतून तयार झालं आहे. ‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा गोरंट्याल यांनी दिली होती. आता तेच गोरंट्याल भाजपात आहेत. त्यांनीच १०० कोटी खर्च करून निवडणूक जिंकल्याची कबुली दिली. मग फडणवीसांनी खोक्याची भाषा करू नये.”
‘उद्धव-राज एकत्र आल्याचा धक्का बसलाय’
राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अजूनही उद्धव ठाकरेंवर अडकून आहेत. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत, याचा धक्का ते अजूनही पचवू शकलेले नाहीत. त्यांचं लक्ष महत्त्वाच्या प्रश्नांवर न राहता, विनोदी राजकारणाकडे अधिक आहे.”
‘मराठीसाठी आक्रमक होणार’ – राऊतांचा इशारा
“मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक व्हावं लागलं, तर ते आम्ही होणारच. तुम्ही मुरारजी देसाई व्हायला जाताय का? आमच्यावर गोळ्या झाडणार का? आम्ही मराठीचा आग्रह करतोय, त्यात चूक काय आहे? गुजरातमध्ये हिंदी सक्ती करा, मग महाराष्ट्रावर ती लादा,” असं आव्हानही त्यांनी दिलं.
‘फडणवीस अपयशी, फुगवलेला फुगा’
राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना थेट अपयशी मुख्यमंत्री ठरवत म्हटलं, “फडणवीसांचं नेतृत्व म्हणजे एक फुगवलेला फुगा आहे, जसा मोदींच्या नेतृत्वाभोवती हवा भरली गेली आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारी वाढतेय. त्यावर ते का बोलत नाहीत?”
‘बिहारी हाकलले, मग आम्ही मराठी का बोलू नये?’
“राज ठाकरे म्हणतात तसे, गुजरातमध्ये वीस लाख बिहारी हाकलले गेले. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार बनवलं. मग आम्ही मराठी भाषेचा आग्रह का धरू नये?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी मराठी अस्मिता, खोक्यांची राजकारणं आणि विदर्भ वेगळा राज्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.