• Sun. Oct 19th, 2025

५० हजार कोटींचा भूखंड घोटाळा; शिंदे-शिरसाट यांच्यावर संजय राऊत यांचा थेट आरोप, दिल्लीतील ‘बॉस’लाही १० हजार कोटी दिल्याचा गौप्यस्फोट



५० हजार कोटींचा भूखंड घोटाळा; शिंदे-शिरसाट यांच्यावर संजय राऊत यांचा थेट आरोप, दिल्लीतील ‘बॉस’लाही १० हजार कोटी दिल्याचा गौप्यस्फोट

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारा “लेटर बॉम्ब” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी टाकला आहे. तब्बल ५० हजार कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात नगरविकास खाते आणि सिडको थेट सामील असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. राऊत यांच्या मते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी २० हजार कोटी रुपयांचा अपहार करून त्यातील १० हजार कोटी रुपये दिल्लीतील ‘बॉस’ला पोहोचवले. या आरोपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे सांगतात. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” अशी घोषणा देतात. मात्र वास्तव वेगळे असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या मते, केंद्र सरकारच्या नेतृत्वाखालील तपास यंत्रणाच भ्रष्टांना संरक्षण देत आहेत.

राऊत यांनी आपल्या पत्रात रायगड जिल्ह्यातील ४०७८ एकर वनजमीन बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचा उल्लेख केला आहे. या कुटुंबाला सरकारच्या १२.५ टक्के भूखंड वाटप योजनेनुसार हक्क नसतानाही नगरविकास मंत्री शिंदे आणि त्यावेळचे सिडको अध्यक्ष शिरसाट यांनी “पत्र ठरवून” जमीन दिली, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी शिंदे यांनी फक्त २५ दिवसांसाठी संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती केली होती आणि याच काळात घाईघाईने जमीन वाटपाचा निर्णय घेतला गेला, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

राऊत यांच्या मते, या व्यवहारासाठी तब्बल २० हजार कोटींची लाच दिली गेली आणि त्यानंतरच संपूर्ण प्रकरण पार पडलं. त्यामुळे या घोटाळ्याची तात्काळ ईडीमार्फत चौकशी करून एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संबंधित सिडको अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शिंदे आणि शिरसाट यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असा ठाम आग्रहही राऊत यांनी पत्रातून मांडला. या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून शिंदे गटाची आगामी भूमिका काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें