मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर;राज ठाकरे तब्बल २० वर्षांनी शिवसेना भवनात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करुन केली. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरु केली. बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. भाजपचा राहुल नार्वेकर हा आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतो. त्यांचा अधिकार विधानसभेत आहे, बाहेर ते एक आमदार आहेत. ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात. हे विधानसभा अध्यक्षपदाच्या प्रतिमेला छेद देणारे वक्तव्य आहे. ते नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे समोरच्याचे संरक्षण काढून घ्यायला सांगतात. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
आम्ही २५ वर्षांत मुंबईत फार साधी-साधी कामं केली आहेत. साधं कोस्टल रोडचं काम केलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलं आहे, कोरोनात लहानसहान कामं केली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामं केली, मोदींनी कैलास पर्वत बांधला आहे. स्वर्गातून गंगा त्यांनी आणली आहे. मिंध्यांनी अरबी समुद्र तयार केला आहे, ही त्यांची काम मागत पडत आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईच्या रिगल चौकात शिवसेनाप्रमुखांचा पुतळ्याची जागा आम्ही निवडली, तो पुतळा माझ्या देखरेखीत तयार झाला, त्याचे श्रेयही मिंधे घेत आहेत. त्याऐवजी अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांनी तयार केला, अरबी समुद्रात मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन तयार केले होते. ते पाण्यातील शिवस्मारक बाहेर कधी काढणार? समुद्र मंथनही मोदींनी केलं होतं, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी तब्बल २० वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा पाऊल ठेवले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांनी हाताला धरुन राज ठाकरे यांना शिवसेना भवनात नेले. राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा वचननामा आता मुंबईकरांना कितपत भावणार, हे आता आगामी काळात दिसून येईल.
शिवसेना आणि मनसेचा हा वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वी रविवार सकाळपासून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरु होती. संजय राऊत यांनी रविवारी सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात आले. यानंतर शिवसेना भवनात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक लहानशी बैठक होऊन पत्रकार परिषदेतील मुद्दे निश्चित करण्यात आले. या बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी, राज ठाकरे हे २० वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. संजय राऊत यांनी मी २० वर्षांनी आल्याचा उल्लेख केला. ते ऐकून मला वाटत होतं की, मी २० वर्षांनी सुटून आलोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

