• Thu. Jul 23rd, 2026

विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराविरोधात सफाळे रस्त्यावर; ‘लोकशाही दडपशाही सहन करणार नाही’चा एल्गार



विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराविरोधात सफाळे रस्त्यावर; ‘लोकशाही दडपशाही सहन करणार नाही’चा एल्गार

दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी, सर्वपक्षीय संघटना व नागरिकांचा सहभाग

पालघर : नवीन पाटील

दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे गुरुवारी (दि. २३) नागरिकांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या समर्थनार्थ जोरदार आवाज उठविला. सफाळे परिसर लोकशाही बचाव समितीच्या वतीने आयोजित या शांततापूर्ण आंदोलनात ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सफाळे फुल मार्केट परिसरात झालेल्या या आंदोलनात उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित बळाच्या वापराचा तीव्र निषेध नोंदवत, लोकशाहीत मतभिन्नता व्यक्त करणे आणि शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच छेद देणारे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आंदोलकांनी संबंधित घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

घोषणाबाजी करत आंदोलकांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलन संपूर्णपणे शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या आंदोलनाला सर्वपक्षीय संघटना, विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांनीही जाहीर पाठिंबा दिला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें