• Fri. Jun 5th, 2026

मंडप नाही, सावली नाही; रणरणत्या उन्हात जरांगेंचा निर्धार, सरकारच्या शिष्टमंडळालाही यश नाही



मंडप नाही, सावली नाही; रणरणत्या उन्हात जरांगेंचा निर्धार, सरकारच्या शिष्टमंडळालाही यश नाही

जालना : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी वेळ देण्यास स्पष्ट नकार देत उद्यापासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी त्यांची भेट घेत मनधरणीचा प्रयत्न केला; मात्र चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण अटळ असल्याचे स्पष्ट झाले.

सरकारकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र “सातारा गॅझेटचा जीआर लेखी स्वरूपात द्यावा” या प्रमुख मागणीवर ठोस आश्वासन न मिळाल्याने चर्चेला अपेक्षित यश आले नाही.

याआधी पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर थेट टीका टाळत, “गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांवर अन्याय होत आहे. त्यामुळे भूमिका घ्यावीच लागेल,” असे म्हटले होते. “मंडप नाही, सावली नाही, तरीही रणरणत्या उन्हात उपोषण करणार,” असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आंतरवाली सराटी येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आता सरकारला वेळ देण्यास मी तयार नाही. लेखी निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून उपोषण सुरू होईल.” त्यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारपुढील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, जरांगे पाटील यांच्या नव्या उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें