‘ऑपरेशन टायगर’ची गरज नाही; उबाठाच्या कोणत्याही खासदाराशी संपर्क नाही – उदय सामंत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : शिवसेना (शिंदे गट) नेते व मंत्री उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम देत उबाठा गटाच्या कोणत्याही खासदाराशी संपर्क नसल्याचे स्पष्ट केले. “उबाठाच्या कोणत्याही खासदारासोबत बैठक झालेली नाही. आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नाही,” असे सामंत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतल्यानंतर २२ जून रोजी आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी “देशहितासाठी कोणी सोबत येत असेल तर त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तर खासदार अरविंद सावंत यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेचे कौतुक करत शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मुद्द्यावर पुन्हा भाष्य केले.
उबाठा गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील तर्क-वितर्कांना काही प्रमाणात विराम मिळाला आहे.

