डोंबिवलीत विजेच्या मुद्द्यावरून भाजपाचा जोरदार राडा; नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट अल्टिमेटम
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या तीव्र लपंडावामुळे कल्याण डोंबिवलीकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. ऐन उन्हात दुपारी आणि रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब होत असल्याने लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांचे हाल होत आहेत. नागरिकांच्या याच संतापाचा आता डोंबिवलीत उद्रेक झाला असून महावितरणविरोधात भाजपा थेट रस्त्यावर उतरली आहे.
भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट आणि जाहीर इशारा दिला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांची हीच वागणूक राहिली तर ते मार खाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा म्हात्रे यांनी दिलाय.
कल्याण आणि डोंबिवलीत सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत महावितरणच्या विरोधात भाजपा अत्यंत आक्रमक झाली आहे. कल्याणमध्ये भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी कल्याण भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात डोंबिवलीतील भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांनी डोंबिवली एमआयडीसीतील महावितरण कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.
या चर्चेदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वीज खंडित होण्याबाबत कोणतेही ठोस उत्तर नव्हते. यामुळे भाजपा नेत्यांनी अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त केला. दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, विजेच्या लपंडावामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. आमचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते अधिकाऱ्यांना नेहमी सहकार्य करतात, मात्र महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सहकार्य करत नाही.महावितरणच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाहीत, अशी मोठी तक्रार यावेळी करण्यात आली. नागरिकांनी तक्रार केली तर त्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हीच वागणूक यापुढे राहिली, तर ते मार खाल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देत भाजपा नेत्यांनी महावितरणला तात्काळ सुधारणा करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

