तारीख पे तारीख! शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची पुढची सुनावणी आता २१ जानेवारी २०२६ ला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पुन्हा एकदा पुढील तारीख देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी आता पुढील वर्षी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. म्हणजेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर “खरा पक्ष आणि मूळ चिन्ह कोणाचे?” या प्रश्नावरून वाद निर्माण झाला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
१२ नोव्हेंबर रोजी या दोन्ही प्रकरणांवर प्राथमिक सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आता पुढील सुनावणीची तारीख २१ जानेवारी २०२६ निश्चित केली आहे. त्या दिवशी प्रथम शिवसेना प्रकरणावर युक्तिवाद होईल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरण ऐकले जाणार आहे. दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. ही सुनावणी सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २६ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अखेरीस महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष आणि त्याचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाच्या मालकीचं ठरणार, या मुद्द्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यापासून हा वाद कायम चर्चेत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या २१ जानेवारीच्या सुनावणीकडे राज्यातील सर्वच राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

