आईस्क्रीममध्ये तीन इंचांची कीड आढळल्याचा दावा; कल्याणमध्ये खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातून अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. स्थानिक दुकानातून खरेदी केलेल्या कोन आईस्क्रीममध्ये सुमारे तीन इंच लांबीची कीड आढळल्याचा दावा एका मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रचना पार्क परिसरात राहणाऱ्या शशांक जाधव या मुलाने स्थानिक दुकानातून कोन आईस्क्रीम खरेदी केले होते. आईस्क्रीम खात असताना त्याला त्यामध्ये संशयास्पद वस्तू दिसली. त्यानंतर तपासणी केली असता त्यात कीड असल्याचे आढळल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यानंतर त्यांनी संबंधित दुकानदाराकडे धाव घेत याबाबत जाब विचारला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुकानदाराने संबंधित कंपनीच्या वितरकाला घटनास्थळी बोलावले. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित आईस्क्रीम सीलबंद अवस्थेत कंपनीकडून प्राप्त झाले होते. तसेच उत्पादनाची मुदतही वैध होती, असा दावा त्याने केला.
या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आईस्क्रीमचे नमुने तपासणीसाठी घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित कंपनी किंवा अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

